मी माझी भूमिका शोधत आहे... मी नेहमी बाहेरच्या सिस्टमबद्दल बोलतो. समाज, व्यवस्था, परंपरा, राजकारण, संस्कृती या सगळ्या बाहेरच्या सिस्टम मला दिसतात. पण माझ्या आत जी एक सिस्टम आहे, तिचं काय?
मी बदलाच्या प्रक्रियेत आहे. मी बदलत आहे. पण बदलताना अनेकदा असं वाटतं की बाहेरची सिस्टम मला बदलू देत नाही. मात्र, हा आरोप करण्यापेक्षा मला स्वतःलाच एक प्रश्न विचारायला हवा. माझ्या आतल्या सिस्टमला बदलण्यासाठी मी काय करत आहे?
माझी सिस्टम म्हणजे माझं विचार करणं, वागणं, जगणं; माझ्या सवयी, माझे पूर्वग्रह, माझ्या भीती आणि परंपरांना धरून ठेवणारी माझी मानसिकता. मी स्वतःमध्ये बदल घडवत नाही, पण बाहेरच्या सिस्टमवर दोष टाकून मोकळा होतो.
अशा वेळी एक कलाकार म्हणून, एक व्यक्ती म्हणून माझी भूमिका आणि जबाबदारी काय आहे? हा प्रश्न मला खरोखर पडतो का? की मी तो टाळतो? की माझ्या संवेदना हळूहळू मृत होत जातात?
८ ते १२ जुलै २०२६ रोजी थिएटर ऑफ रेलेव्हन्सच्या 'रंगभूमी : सृजन आणि संवर्धन' या निवासी कार्यशाळेत, मंजुल भारद्वाज उत्प्रेरित चैतन्य अभ्यासातून मला एक महत्त्वाची जाणीव झाली. मला सर्वप्रथम माझ्या आतल्या सिस्टमला बदलायचं आहे.
हा बदल एका दिवसात होणार नाही. त्यासाठी मला सातत्याने प्रवाहित राहायचं आहे पाण्यासारखं. पाण्याचा स्वभाव मला हे शिकवतो. पाणी कधीच थांबत नाही. डोंगरमाथ्यावरून खळखळत वाहणारं पाणी स्वतःचा मार्ग स्वतः तयार करतं. सततच्या प्रवाहातून ओहोळ तयार होतो, ओहोळातून ओढा, आणि कालांतराने नदी जन्म घेते. त्या नदीचा मार्ग तिच्या सातत्याचा पुरावा असतो. पाणी त्या क्षणी असो वा नसो, त्याने निर्माण केलेली वाट चारही ऋतूंमध्ये दिसत राहते.
रंगभूमीसाठी आम्ही थिएटर ऑफ रेलेव्हन्सचे रंगकर्मीही असाच एक प्रवाह निर्माण करत आहोत. हा प्रवाह केवळ आजसाठी नाही; तो येणाऱ्या पिढ्यांसाठी आहे, जेणेकरून रंगकर्म जिवंत राहील, संवेदनशील राहील आणि सतत प्रवाहित राहील.
माझी दृष्टी प्रज्वलित ठेवायची आहे त्यासाठी माझं ध्येय अधिक व्यापक करणं आवश्यक आहे. माझं ध्येय केवळ माझ्यापुरतं किंवा माझ्या कुटुंबापुरतं मर्यादित राहून चालणार नाही. त्याची व्याप्ती समाजापर्यंत, संस्कृतीपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी मी सतत पुढाकार घेत राहणार



.jpg)
No comments:
Post a Comment