Friday 30 November 2018

मराठी रंगभूमीवर वैचारिक मूल्यांची सुरुवात माझ्या "अनहद नाद - Unheard Sounds of Universe" या वैचारिक नाटकाने ! ९९ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची निवड झाली त्याबद्दल त्यांचे "थिएटर ऑफ रेलेवंस" नाट्य सिद्धांताच्या अभ्यासकांच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि त्यांनी घेतलेली वैचारिक नाटकाची नोंद म्हणून त्यांचा हा लेख..


कलेचा हेतू... मानवी उन्नयन

- प्रेमानंद गजवी







थिएटर ऑफ रिलेवन्स ही संकल्पना घेऊन रंगकर्मी मंजुल भारद्वाज हे गेली २५ वर्षे देश आणि परदेशात नाटकं करत आहेत. आपल्या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांनी नुकताच एक नाट्यमहोत्सव मुंबईत भरवला होता, त्याचा वेध-

एखादी नाट्यसंस्था पंचवीस वर्ष टिकून राहणं ही मोठी नवलाईची गोष्ट आहे, आजच्या काळात! बरेचदा ग्रुप तयार होतो आणि त्याचवेळी तो तोडता कसा येईल याचा विचार एखादा न्रतद्रष्ट मेंदू करीत असतो. असा कुणी 'थिएटर ऑफ रेलेवन्स' मधे नसेलच असं खात्रीपूर्वक नाही सांगता येत पण असं संकट येताना दिसलं तर... डोळ्यातलं 'कुसळ' अलगद दूर करून आपलं ध्येय कौशल्यानं पुढे नेणं, हे महत्त्वाचं, आणि ध्येय काय? तर कलेनं केवळ कलेसाठीच न राबता समाजासाठी कष्टरत होऊन त्यांच्या जीवनाचा एक भाग होणं, हे आजच्या केवळ पैशांचा विचार करीत असलेल्या जगात केवढं कठीण!

पण मंजुल भारद्वाज हा एक असा रंगकर्मी... खरं तर प्रथम लेखक... असा लेखक, ज्याची लेखक-नाटककार म्हणून स्वतःची एक दृष्टी आहे. म्हणूनच तो 'कलेसाठी कला' या सूत्रात अडकून पडला नाही तर 'जीवनासाठी कला' असा विचार करीत असतानाच त्याच्याही नकळत 'ज्ञानासाठी कला' Art for knowledgeकडे तो झेपावला आहे आणि त्यातूनच त्यानं सिद्ध केलंय, 'कला कुणाची बटीक नसते आणि बटीक असते ती कला नसते.' बटीकपण नाकारत मंजुल म्हणतो, 'कलेनं मनोरंजनाच्या सीमा तोडून जीवन कसं जगलं पाहिजे, हे सांगितलं पाहिजे' म्हणजेच जीवन कसं जगावं याचं ज्ञान (knowledge) दिलं पाहिजे कलेने आणि म्हणून तीन दिवस... दि. १५-१६-१७ नोव्हेंबर २०१७; सकाळी ११ वाजता ' थिएटर ऑफ रेलेवन्स' ची पंचवीस वर्ष अतिशय उत्साहात संपन्न होतात.

मंजुल भारद्वाज आणि त्याची टीम प्रचंड उत्साहात. पहिली बेल होते, मी थिएटरमध्ये प्रवेश करतो. थिएटर, शिवाजी मंदिर. पडदा तसा उघडाच, बेल होऊनही. दुसरी बेल... तिसरी बेल... मंजुल भारद्वाज थिएटर मध्ये प्रवेशतो. मी हात मिळवायला पुढे. मी शुभेच्छा देतो आणि इनमीन १०-१२ प्रेक्षक बघून म्हणतो, 'पैसों का क्या?' तोच धागा पकडून तो म्हणतो, 'पैशाची चिंता करत नाही, पैशाची चिंता करत बसलो तर काहीच करता येणार नाही' आणि नाटकाची रूपरेखा सांगू लागतो.

'गर्भ' लेखक/दिग्दर्शक मंजुल भारद्वाज आणि नाटकाचा विषय : माणसानं आयुष्यभर माणूसपण सिद्ध करणं. किती अवघड आहे आपल्यातील माणूसपण सिद्ध करत राहणं! अगदी झोपेत सुद्धा? झोपेचं काय, गर्भात सुद्धा आपल्या माणूसपणाची कसोटी लागते. गर्भ धारणेपासूनच गर्भावर बाह्य संस्कार होतात. म्हणजे आई जो विचार करते, तोच विचार पेरला जातो गर्भाच्या मेंदूत. माता नकारार्थी विचार करत असेल तर...किंवा माताच मनात म्हणत असेल, बाहेरचं हे जग किती क्रूर आणि त्याचवेळी गर्भाच्या मनात प्रश्न येत असेल, 'अशा क्रूर जगात मी कशाला येऊ?' तर?

इथं मी नाटकाची कथा सांगणं आणि ती तुम्ही वाचणं, एक निरर्थक वेळ दवडणं आहे. मंजुलचं निवेदन संपतं आणि मंचावर प्रवेश गर्भाचा...आणि पहिलाच हुंकार, 'कुदरत- बेमिसाल- अद्भुत. अश्विनी नांदेडकरचा तो 'हुंकार' ९० मिनिटं आपल्याला हाकारत राहतो, पण ती एकटीच नाही. सोबतीला आहेत योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के. नाटक मातेच्या गर्भातून पृथ्वीतलावर येण्यापूर्वीच कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागेल याचं दर्शन घडवंत. जग वाईट असलं तरी सुंदरही आहे, हे सांगतं. खरं म्हणजे हे शब्दांत सांगणं कमीच आहे. प्रत्यक्ष प्रयोग अनुभवणं उत्तम! विविध आकृतिबंध कलावंतांनी साकारलेले; अगदी 'गर्भाशय' देखील. प्रकाश योजनेची उत्तम सोबत, प्रकाश योजना होती असं जाणवतच नाही. तीच गत नीला भागवत यांच्या संगीताची. अरे हे मी का सांगत बसलो, 'प्रयोग अनुभवणं उत्तम' म्हटल्यावर?

दुसऱ्या दिवशी १६ नोव्हेंम्बर १७, 'अनहद नाद' म्हणजे Unheard sounds of Universe! पद्धत तीच सादरीकरणाची. पडदा उघडाच आहे आणि मंजुल भारद्वाज नाटकाची पार्श्वभूमी सांगतोय. निसर्ग विविध ध्वनींनी आपल्या आजूबाजूला वावरतो की आपण निसर्गाच्या हृदयातील विविध ध्वनींच्या सान्निध्यात जगतो? जलाशयाचं खळाळा वाहणं - त्या वाहण्याचा झुळझुळणारा अनहद ध्वनी... जगण्याचा ध्वनी, आणि हे जगणं सुंदर व्हायचं असेल तर जगण्याचाही एक अनहद ध्वनी ऐकता यायला हवा.

'गर्भ' मध्ये अश्विनी तर 'अनहद नाद' मध्ये योगिनी चौक. कमाल. त्यातील आशयसूत्रातील एक वाक्य, नव्हे निव्वळ एक शब्द... 'भागले या भाग ले'. जीवनाचं सारं सूत्र 'भागले; या भाग ले' या शब्दांत सांगितलं आहे. नाटककार एका शब्दाशी खेळून शब्द अर्थवाहित्व सिद्ध करतो. शब्दकाव्य समोर ठेवतो. गर्भ पेक्षाही हा प्रयोग विविध आकृतिबंधांनी नटला आहे, पक्ष्यांचा आवाज, शीळ, झाडाच्या फांद्यांची सळसळ, दिग्दर्शकानं आपलं सारं कसब इथं रितं केलंय. एक बारीकसा दोष या प्रयोगातील वेशभूषेतला, योगिनी चौक, कोमल खामकर, अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर सगळे अंगावर जॅकीट घालतात, तर मग तुषार म्हस्केच तेवढा का नाही? योगिनी मुख्य भूमिका जगते पण बाकीचे चौघे नसतील तर... सारं निरर्थक आहे. इतका 'एकरूप' प्रयोग आहे. सुंदर.

तिसऱ्या दिवशी 'न्याय के भंवर में भंवरी'. सादरीकरण पद्धत तशीच, पडदा उघडाच आहे. दिग्दर्शक मंजुल पार्श्वभूमी सांगतो नि प्रयोग सुरू होतो. भंवरी वर जो बलात्काराचा प्रसंग ओढवला तो आपण सारे सूज्ञ जाणतो. सर्व समान आहेत, पण काही अधिक समान आहेत. या अधिक समान घटकांतील न्यायाधीशानं समान घटकांतील भंवरीला काय न्याय दिला? 'मनू कायद्या'नुसार भंवरी वर बलात्कार झालाच नाही. स्त्री जीवनाचे सारेच दुष्टत्व. लहानपणी वडिलांच्या, मोठेपणी नवऱ्याच्या आणि म्हातारपणी मुलाच्या धाकात राहण्याची शिक्षा स्त्री भोगत असते. शहरातील शिकलेल्या स्त्रियांचं ठीक. खरंतर ठीकच. पण खेड्यातील चित्र आजही भयाण आहे. डोक्यावरचा पल्लू आजही तसाच डोक्यावर, चेहरा लपवून. बबली रावत भंवरी जगली आणि प्रत्येक स्त्री एक भंवरी आहे, हे लेखनसूत्र नजाकतीने समोर ठेवलं. हा एकपात्री प्रयोग, पण एकपात्री वाटला नाही कारण सशक्त लेखन-दिग्दर्शन आणि अभिनय.

तिन्ही दिवस निखिल आणि शिवाजी यांची प्रकाशयोजना आणि संगीताची सुंदर सोबत. तीनही दिवस प्रयोग संपल्यानंतर प्रेक्षकांना स्टेज वर बोलवून कलावंत, लेखक, दिग्दर्शक तसेच प्रकाश योजनाकार, संगीतकार आणि प्रेक्षक यांच्यात घडलेला संवाद अधिक प्रेरणादायी होता.

कला क्रांती करू शकते? थेट उत्तर 'नाही' असंच दिलं जातं पण कला लोकांना 'क्रांतिप्रवण' करू शकते, एवढं खरं. शिवाजी मंदिरमध्ये घडलेल्या या तीन दिवसीय नाट्य महोत्सवास प्रेक्षक प्रतिसाद कमी होता, पण आपली पंचवीस वर्षे पूर्ण करणं आणि त्या कौतुकलेल्या वातावरणात मंजुल भारद्वाज यांचं रंगमंचीय कर्तृत्व बघून संजय आवटे यांनी 'आचार्य' ही पदवी बहाल करणे, यातच या तीन दिवसीय महोत्सवाचं मूल्य अधोरेखित होतं.

तीन दिवस मी अनुभवले, सर्वांग सुंदर अनुभव. माणूस म्हणून उन्नत झालो. माणूस म्हणून माझी कर्तव्यं काय याचं बोधीज्ञान... knowledge मला मिळालं. हाच तर कलेचा हेतू!

https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manjul-bhardwaj/articleshow/62096018.cms?utm_source=facebook.com&utm_medium=referral


#viral #मराठी_रंगभूमीवर_वैचारिक_मूल्यांची_सुरुवात_माझ्या_अनहद_नाद_Unheard_Sounds_of_Universe 
#manjulbhardwaj #play #premanandgajvi #maharashtratimes

हे रंगभूमी तुला हा रंगकर्मी आवाहन करत आहे...तुषार म्हस्के

रंगभूमी तुला आता सज्ज व्हायचं आहे...
निर्माण केलेल्या कलेला आणि कलाकाराला जिवंत ठेवायचं आहे...
विचारवंत कलाकारांची निर्मिती करायची आहे... 
मरगळ आलेल्या मनाला आता जाग कर,नवतेजाने पुन्हा कलेची पालवी या जनमानसात फुलवायची आहे...
बाजारीकरणाच्या या संसारात गळत असणाऱ्या तुझ्या शरीराचं विरघळण तुला थांबवायचं आहे...
नवीन उमेदीची नवीन सृष्टी अजून तुला निर्माण करायची आहे... 
तुझ्या दुखापेक्षा आठव तो क्षण ज्या क्षणी 
एका ठिकाणी शेतकरी आत्महत्या करतोय ... त्याच क्षणात निर्माण होत असणाऱ्या व्यक्तीच्या विकारांना संपवायचं आहे... 
बघ उघड्या डोळ्यांनी तो क्षण ज्या ठिकाणी एका बाजूला देवीची पूजा होते दुसऱ्या क्षणी तिच्यावर बलात्कार होतोय..त्याच विकृतीला तुला थांबवायचं आहे ...



बघ तो क्षण ज्या क्षणाला तू तरुणांना जगण्याची उमेद देतेस त्यांच्या विचारांना सकारात्मक दिशा देऊन 'वाल्याचा वाल्मिकी' बनवतेस , त्यांना मायेचा पदर देऊन एक आदर्श म्हणून डोळ्यासमोर उभं करतेस अशा असंख्य तरुणांना तुला उभं करायचं आहे...
आठव तो क्षण ज्या क्षणाला तू आपल्या अस्तित्वाच्या निर्माणासाठी लढलेली लढाई,जी महिलांना सावित्रीबाई फुले च्या ज्ञानाची ज्योत घेऊन बाहेर पडून आपल्या ध्येयाला आपल्या कलेबरोबर जोडत एक आदर्श समाज रचना करतेस " महिला वस्तू नाही मनुष्य आहे " मनुष्य म्हणून स्वीकार कर ह्या विचाराला तू रुजवतेस ... अशा असंख्य महिलांना सक्षम करून एक न्यायप्रिय समाज बनवायचा आहे ... 
बाजारीकरणाच्या चक्रव्यूहात अडकलेली रंगभूमी आणि कलाकार यांना तू उन्मुक्त केलंस आता एक नव्या उमेदीच्या नवीन रंगकर्मींची पिढी तुला तयार करायची...
तुझ्या भोवती निर्माण होणाऱ्या नकारात्मक उर्जेला तुला आपल्या कलेने सकारात्मक करायचं ... घाबरू नकोस हे " माय - रंगभूमी " एक कलाकार म्हणून रंगकर्म करण्यासाठी हा रंगकर्मी सज्ज आहे... 
असंख्य वेदना संवेदना घेऊन इच्छा पूर्ती करणारी " रंगभूमी " तुला पुन्हा नव्या थाटात उभं राहायचं आहे...
देशात निर्माण झालेल्या विकारांना संपवण्यासाठी पवित्र राजगति ची पवित्र राजनीती घेऊन जनमानसात उतरायचं आहे आणि रंगकर्माला तुला या जनमानसात अमर करायचं आहे ... 
हे रंगभूमी तू नेहमीच आपल्या commitment ला जागली आहेस... 
कलाकाराने केलेल्या इच्छेची ...तू इच्छा पूर्ती केली आहेस... 
आता तुला तुझ्या चेतनेने तुझ्या शरीरातील स्नायूंना घट्ट करून पर्वताप्रमाणे तटस्थ उभं रहायचं आहे... 
हे रंगभूमी तुला हा रंगकर्मी आवाहन करत आहे...


रंगकर्मी
तुषार म्हस्के

#रंगभूमी #नाटक #थिएटरऑफरेलेवन्स #कलाकार #विचार #प्रेरणा