Friday 30 November 2018

हे रंगभूमी तुला हा रंगकर्मी आवाहन करत आहे...तुषार म्हस्के

रंगभूमी तुला आता सज्ज व्हायचं आहे...
निर्माण केलेल्या कलेला आणि कलाकाराला जिवंत ठेवायचं आहे...
विचारवंत कलाकारांची निर्मिती करायची आहे... 
मरगळ आलेल्या मनाला आता जाग कर,नवतेजाने पुन्हा कलेची पालवी या जनमानसात फुलवायची आहे...
बाजारीकरणाच्या या संसारात गळत असणाऱ्या तुझ्या शरीराचं विरघळण तुला थांबवायचं आहे...
नवीन उमेदीची नवीन सृष्टी अजून तुला निर्माण करायची आहे... 
तुझ्या दुखापेक्षा आठव तो क्षण ज्या क्षणी 
एका ठिकाणी शेतकरी आत्महत्या करतोय ... त्याच क्षणात निर्माण होत असणाऱ्या व्यक्तीच्या विकारांना संपवायचं आहे... 
बघ उघड्या डोळ्यांनी तो क्षण ज्या ठिकाणी एका बाजूला देवीची पूजा होते दुसऱ्या क्षणी तिच्यावर बलात्कार होतोय..त्याच विकृतीला तुला थांबवायचं आहे ...



बघ तो क्षण ज्या क्षणाला तू तरुणांना जगण्याची उमेद देतेस त्यांच्या विचारांना सकारात्मक दिशा देऊन 'वाल्याचा वाल्मिकी' बनवतेस , त्यांना मायेचा पदर देऊन एक आदर्श म्हणून डोळ्यासमोर उभं करतेस अशा असंख्य तरुणांना तुला उभं करायचं आहे...
आठव तो क्षण ज्या क्षणाला तू आपल्या अस्तित्वाच्या निर्माणासाठी लढलेली लढाई,जी महिलांना सावित्रीबाई फुले च्या ज्ञानाची ज्योत घेऊन बाहेर पडून आपल्या ध्येयाला आपल्या कलेबरोबर जोडत एक आदर्श समाज रचना करतेस " महिला वस्तू नाही मनुष्य आहे " मनुष्य म्हणून स्वीकार कर ह्या विचाराला तू रुजवतेस ... अशा असंख्य महिलांना सक्षम करून एक न्यायप्रिय समाज बनवायचा आहे ... 
बाजारीकरणाच्या चक्रव्यूहात अडकलेली रंगभूमी आणि कलाकार यांना तू उन्मुक्त केलंस आता एक नव्या उमेदीच्या नवीन रंगकर्मींची पिढी तुला तयार करायची...
तुझ्या भोवती निर्माण होणाऱ्या नकारात्मक उर्जेला तुला आपल्या कलेने सकारात्मक करायचं ... घाबरू नकोस हे " माय - रंगभूमी " एक कलाकार म्हणून रंगकर्म करण्यासाठी हा रंगकर्मी सज्ज आहे... 
असंख्य वेदना संवेदना घेऊन इच्छा पूर्ती करणारी " रंगभूमी " तुला पुन्हा नव्या थाटात उभं राहायचं आहे...
देशात निर्माण झालेल्या विकारांना संपवण्यासाठी पवित्र राजगति ची पवित्र राजनीती घेऊन जनमानसात उतरायचं आहे आणि रंगकर्माला तुला या जनमानसात अमर करायचं आहे ... 
हे रंगभूमी तू नेहमीच आपल्या commitment ला जागली आहेस... 
कलाकाराने केलेल्या इच्छेची ...तू इच्छा पूर्ती केली आहेस... 
आता तुला तुझ्या चेतनेने तुझ्या शरीरातील स्नायूंना घट्ट करून पर्वताप्रमाणे तटस्थ उभं रहायचं आहे... 
हे रंगभूमी तुला हा रंगकर्मी आवाहन करत आहे...


रंगकर्मी
तुषार म्हस्के

#रंगभूमी #नाटक #थिएटरऑफरेलेवन्स #कलाकार #विचार #प्रेरणा

No comments:

Post a Comment