ती न्यायाची अजूनही वाट पाहत आहे,
ती एक स्त्री, राजस्थानी वेषात आपल्यापुढे उभी राहून तिची कहाणी आपल्याला सांगत असते. सांगता-सांगता आपल्याशी बोलता-बोलता ती पूर्ण मानव जातीचा, पितृसत्ताक समाज पद्धतीचा संपूर्ण इतिहासच आपल्यापुढे उलगडत असते. ती सांगत असते, या पितृसत्ताक समाजाने स्त्रीवर केलेला अन्याय.. ती सांगत असते, पुरुषांना त्यांचा वारस पुरुष हवा असतो.... ती सांगत असते, पुरुषांना आपली संपत्ती दुसरा पुरुषच बळकावील याची कायम भीती असते ... असं खूप काही... खुप काही ती सांगते आपल्याला... सांगता-सांगता ती आजच्या तिच्या कहाणीवर कधी येते आपल्या लक्षातही येत नाही याच समाजातील पुरुषी मानसिकतेने, स्त्रीला दुय्यम स्थान देणाऱ्या या इतिहासाने, स्त्रीला फक्त मुलं जन्माला घालण्यास, पुरुषाला सुख देण्यास स्थान दिले आणि याच मानसिकतेने तिच्यावर स्त्री म्हणून अत्याचार, बलात्कार केला आहे.
ती सांगते, की ती तर फक्त 'साथी' बनून सरकारी नियमच लागू करायला गेली होती. बालविवाह अडवायला गेली होती. पण त्या उच्च जातीच्या पुरुषांनी तिच्या या कार्याची शिक्षा म्हणून बदला घेण्यासाठी स्वतःच्या शरीराचा उपयोग करून तिच्यावर बलात्कार केला, कारण ते स्त्रीला फक्त शरीरच समजत होते .
मंजुल भारद्वाज यांच्या 'दि एक्सपेेरिमेंटल थिएटर फाउंडेशन' च्या 'न्याय के भंवर में भंवरी' नाटकात बबली रावतने भंवरीच नाही तर, त्या जागी अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारी, पुरुषी मानसिकतेचा सर्वांगाने विचार करणारी एक स्त्री आपल्यासमोर अशी उभी केली आहे की आपल्यालाही विचार करण्यास प्रेरित करते.
नाटकाची सुरुवात भंवरी देवीचं नाव न घेता, मानव जातीचा पितृसत्ताक समाज पद्धतीचा इतिहास सांगण्यास एक स्त्री सुरू करते. ते ऐकता ऐकता काही काळानंतर मला मी एखाद्या डाव्या पक्षाच्या शिबिरात बसले आहे की काय असाच भास झाला. पण काही वेळाने भंवरीने त्या इतिहासाला वळण देऊन, आजच्या परिस्थितीवर बोलायला सुरुवात केल्यावर आपण 'न्याय के भंवर में भंवरी' बघत आहोत हे लक्षात आलं. बबली रावत यांनी आपला आवाज आणि अभिनयाने भंवरीला असं सादर केलं की, ती आपल्या मनात ठसते.
या नाटकात नेपथ्य संगीत आहे ही आणि नाही ही कारण त्याची गरज या नाटकाला नाही. जेव्हा भंवरी एखादा कठीण किंवा वाईट प्रसंग आपल्याला सांगते तेव्हा डफ वाजतो. भवरी इतिहास सांगता-सांगता सांगते की कसा पुरुषाने स्त्रीला दाग-दागिने, पैंजण, घुंगरू देऊन घरात बंद केलं तेव्हा एक मिनिटासाठी घुंगरू वाजतात. भंवरी जेव्हा आपल्यावरील अन्याया बाबतीत आवाज टिपेला लावते, संगीत आपला आवाज देऊन तिची साथ देते, बस बाकी भरून राहतो तो भंवरी चा आवाज.
भंवरी देवी आजही आपली लढाई लढत आहे, याचं दुःख मोठ आहेच पण मंजुल सारखे नाटककार निदान तिचा विषय नाटकातून दाखवण्याचं काम करून तिची साथ देण्याचं काम करतात आणि विचार जिवंत ठेवण्याचं काम करतात.
२६ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता गडकरी रंगायतन, ठाणे येथे रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित - दिग्दर्शित नाटक, "न्याय के भंवर में भंवरी" सादर झाले. नाटकाचे सहकलाकार अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर,कोमल खामकर,तुषार म्हस्के यांनी उत्तम साथ दिली.
मंजुल भारद्वाज आणि 'दि एक्सपेरिमेंटल थिएटर फाउंडेशन' समाजापुढे आलेल्या प्रश्नांवर वेळोवेळी आपल्या "थिएटर ऑफ रेलेवन्स" नाट्य तत्वाच्या माध्यमातून आवाज उठवण्याचे काम गेली सव्वीस वर्षे सातत्याने करत आहेत.
विद्या कोरे.
No comments:
Post a Comment