मराठी रंगभूमी दिनानिमित्त,आम्ही मराठी रंगभूमीच्या वैचारिक प्रगतिशीलतेची प्रतिबद्धता साजरी करीत आहोत, नाटक "लोक-शास्त्र सावित्री" नाटकाने ! - थिएटर ऑफ रेलेवन्स रंगकर्मी
मराठी रंगभूमी दिनानिमित्त म - माणुसकी
रा - रंग
ठी- ठेव
माणुसकीच्या रंगाची
ठेव आहे मराठी !
मर्म रहस्यांनी नटलेली
ठेव आहे मराठी !
ममत्वच्या रसाने उमटलेली
संस्कृती आहे मराठी !
रंग म्हणजे विचार
विचारांचा इंद्रधनुष आहे रंगभूमी !
माणसांमध्ये रंगाची उधळण करते रंगभूमी
माणसाला माणूस म्हणून घडवते रंगभूमी !
- मंजुल भारद्वाज
178 वर्षे पूर्ण झाली आहेत मराठी रंगभूमीच्या वाटचालीला, तरीही मराठी रंगभूमीच्या वैचारिक प्रगतीशीलतेची प्रतिबद्धता कुठे आहे ? जी रंगभूमी कधीकाळी आपल्या कलात्मक प्रगतीशिलतेतुन संपूर्ण देशाला सार्थक रंगकर्मासाठी प्रेरित करीत होती, त्याच रंगभूमीवर आज "वैचारिक नाटक चालत नाही" हे सावट का पसरले ? रंगकर्मींनी हे समजून घेणे आवश्यक आहे की रंगकर्माची भूमिका ही समाजमनाची मशागत करण्याची आहे, त्यांच्यात मनुष्य असण्याची चेतना पेटवण्याची आहे. ना की समाजाच्या प्रश्नांपासून पळवाट काढण्याची !
पशु पासून माणसाला वेगळं करते ती त्याची वैचारिक क्षमता. म्हणूनच "वैचारिक नाटक चालत नाही !" या भ्रमाला हा नाट्य सिद्धांत आपल्या अनेक प्रस्तुतीतून गेले 29 वर्ष खोडत आला आहे. सातत्याने रंगभूमीवर विचारांचे नाटक प्रस्तुत करून प्रेक्षकांना माणूस म्हणून सृजित करणे आवश्यक आहे. इथे रंगचिंतक मंजुल भारद्वाज म्हणतात "विचार करण्याची क्षमता माणसांना जनावरांपासून वेगळी करते. जी लोकं हे म्हणतात की वैचारिक नाटक चालत नाही ते प्रेक्षकांना काय समजतात ?" दिवसभर कामाच्या रगाड्यातून बाहेर पडल्यावर परत वैचारिक नाटक बघण्यास कंटाळा येतो असे म्हणत प्रेक्षकांच्या वैचारिक चेतनेला नाकारणे समाजाला चेतनाहीन बनवणे आहे. प्रेक्षकांना विचारांनी मिळालेले आत्मिक समाधान त्यांच्या रोजच्या आयुष्यात एक नवचैतन्य भरते. आणि आयुष्य कंटाळवाणे न राहता जगण्याची नवदृष्टी प्रदान करते. नाटक म्हणजे क्षणिक आनंद नाही तर आयुष्यभराची सात्विक ठेव आहे. माणसाला माणूस बनवते ती कला. कला जी प्रत्येक मानसिकता, सीमा तोडून मानवाला उंच भरारी देते.
या मराठी रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमीचे वारसदार म्हणून आम्ही रंगभूमीला जिवंत ठेवण्यासाठी लॉकडाऊन च्या काळातही दोन नवीन नाटक मराठी रंगभूमीला दिले आहेत ते म्हणजे संविधानाचे मूल्य वाचवण्यासाठी धनंजय कुमार लिखित आणि मंजुल भारद्वाज अभिनित व दिग्दर्शित नाटक "सम्राट अशोक" आणि स्वतःतील सृजनकाराचा शोध घेण्यासाठी , सावित्रीच्या विचाराला घेऊन माणूस म्हणून अस्तित्व घडवणारे आणि गाजवणारे मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक "लोक-शास्त्र सावित्री" !
समाजाच्या उन्नतीसाठी रंगभूमीला प्रस्थापित दुराग्रह मोडुन काढणे आवश्यक आहे आणि आम्ही मागील 29 वर्षांपासून सातत्याने रंगभूमीला पुनरुज्जीवन देत आहोत.
या संकटकाळात जिथे अखंड समाज, अखंड विश्व थांबले होते तिथे "थिएटर ऑफ रेलेवन्स" नाट्य सिद्धांताच्या रंगकर्मींनी आपल्या रंगभूमीला श्वास दिला, प्राण दिला आहे !
बाजारावादी मानसिकतेत अडकलेला समाज खरेदी आणि विक्रीच्या पलीकडे जात नाही तिथे आम्ही रंगकर्मी केवळ "नफा कमावण्यासाठी नाटक नव्हे तर माणुसकीची दृष्टी जागवण्यासाठी नाटक" या दृष्टी स्पष्टतेने रंगकर्म करत आहोत.
नाटक म्हणजे चेतना , विवेक आणि विचार पेटवणे. रंगभूमीला घडवणारे आम्ही प्रतिबद्ध रंगकर्मी रंगभूमीला घडवण्यासाठी रंगकर्माच्या तत्वाला जगतो, आणि ते म्हणजे कलेच्या माध्यमातून, नाटकाच्या माध्यमातून समाजाला एक रचनात्मक दिशा देत माणसाला माणूस म्हणून जगण्यास उत्प्रेरीत करणे. मूर्च्छित झालेल्या समाजाला विचारांनी जिवंत करण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत.
संवाद म्हणजे आपल्या मतांचे, विचारांचे केलेले प्रवाही चिंतन. मग ते आत्म संवाद असू दे किंवा दोन स्वतंत्र व्यक्तीं मधील संवाद असू दे. संवादाचे अनन्य साधारण महत्व आपल्या जीवनात आहे. पण आजच्या या काळात अनेक संवाद माध्यम असूनही संवाद हरवत चालला आहे. संवाद म्हणजे केवळ शब्द बोलणे नाही तर संवाद एक अनुभूती आहे. आणि म्हणूनच "थिएटर ऑफ रेलेवन्स" नाट्य सिद्धांताच्या रंगकर्मींची ताकद आहे कलात्मक "रंग संवाद". नाटकाच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षकांशी प्रत्यक्ष संवाद करत नाटकाच्या व्याप्तीची आणि रंगभूमीच्या स्पर्शाची जाणीव आम्ही करून देत आहोत. आज समाज संवादहीन झालेला आहे, वाद - विवादात अडकलेला आहे, तिथे आम्ही रंगकर्मी आपल्या कलात्मक पुढाकाराने प्रत्येक प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांना या कलात्मक रंगआंदोलनात सामील करत आहोत, त्यांची सहभागीता सुनिश्चित करत त्यांना प्रक्रियेशी जोडत आहोत. आपल्या रंगभूमीसाठी वैचारिक नाटकांना पाठिंबा देणारे प्रेक्षक निर्माण करत आहोत !
आम्ही "थिएटर ऑफ रेलेवन्स" नाट्य सिद्धांताचे रंगकर्मी मराठी रंगभूमीच्या वैचारिक प्रगतिशीलतेची प्रतिबद्धता साजरी करीत आहोत. रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित-दिग्दर्शित "लोक-शास्त्र सावित्री" नाटकाच्या प्रस्तुतीने!
मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने नाटक "लोक-शास्त्र सावित्री " 7 नोव्हेंबर 2021,रविवारी, सकाळी 11.30 वाजता सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली येथे प्रस्तुत होणार आहे.