सुप्रसिद्ध रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांचे युगपरिवर्तक नाटक “लोक-शास्त्र सावित्री” 3 जानेवारी 2021, रविवार रोजी, दुपारी 3 वाजता.मालती वैद्य स्मृती ट्रस्ट, बदलापूर (पूर्व) येथे प्रस्तुत होणार !
थिएटर ऑफ रेलेवन्स चे शुभचिंतक आणि अभ्यासक माणुसकीचा समाज निर्माण करण्यासाठी , न्यायसंगत व्यवस्थेच्या निर्माणाचे क्रांतिकारी सूत्र घेऊन, नवी पिढी घडवण्याचा संकल्प करून, 3 जानेवारी २०२१ रविवार रोजी, दुपारी 3 वाजता रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित दिग्दर्शित युग परिवर्तक नाटक " लोक - शास्त्र सावित्री " प्रस्तुत करणार आहोत. हे नाटक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत बदलापूर येथे सादर होणार आहे...
कधी : 3 जानेवारी 2021रोजी, रविवार , दुपारी 3 वाजता.
कुठे : “मालती वैद्य स्मृती ट्रस्ट", बदलापूर (पूर्व).
कलाकार: अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, सुरेखा साळुंखे, साक्षी खामकर, तुषार म्हस्के, स्वाती वाघ, प्रियंका कांबळे,अमित राणे,हरिकृष्ण पुली.
वेळ : 70 मिनिटे
एकाधिकारवादाने तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण मानव संस्कृतीला धुळीस मिळवले आहे. जागतिकीकरणाने मानवाचे वस्तुकरण करून त्याला फक्त खरेदी विक्री करणारी उपभोगची सामग्री बनवली आहे .. आज आधुनिकतेच्या नावाखाली तंत्रज्ञानाने आख्या जगाचा विध्वंस केला आहे ...त्या विध्वंसाला प्रश्न विचारण्या ऐवजी आज वैचारिक रूपाने उध्वस्त झालेला समाज त्याला विकास म्हणत आहे ...
अशा प्रलयकाळात सांस्कृतिक सृजनकारच या जगाला वाचवू शकतील, जेव्हा संपूर्ण राजनैतिक व्यवस्था विकली गेलेली आहे. सत्य-असत्याच्या पुढे जाऊन आणि निरंतर खोटे पसरवून समाजाच्या मानसिकतेवर कब्जा करणाऱ्या विकारांपासून आज केवळ सांस्कृतिक सृजनकार मुक्ती देऊ शकतात.
परंतु शोकांतिका आहे की, आज एकही सांस्कृतिक कर्मी जिवंत नाही , जो व्यवस्थेला भिडेल, याउलट पळवाटा शोधत आहे.दृष्टिहीन, विचारहीन गर्दी होत चाललेल्या समाजाला एक कलात्मक वळण देतो तो सृजनकार ! सृजनकार मानवीय चेतना जागवत प्रत्येक व्यक्तिच्या आत असलेल्या कलात्मक पैलूंला स्पर्श करून नवीन काळ रचतात..
कोण आहे आज जो माणूस म्हणून जगतो ? सृजनकार म्हणून जगतो ? आणि निर्माण करतो ? सांस्कृतिक सृजनकार विवेकसंमत असतात. आपले विचार धैर्याने व्यक्त करताना मानवी कल्याणासाठी सत्याचा शोध घेतात.
असाच स्वतःच्या अस्तित्वाचा शोध
सावित्रीबाई फुले आणि बहिणाबाईंनी घेतला होता.
सावित्री बाईंनी पितृसत्ता ,सामंतवाद, जातीवाद यांच्या वर्चस्ववादाला आव्हान दिले होते.
सावित्रीबाई फुलेंनी अज्ञानाच्या फेऱ्यातून अखंड समाजाला बाहेर काढले. वर्षानुवर्षे चालत आलेल्या अनिष्ठ रुढींच्या गुलामीतून बाहेर पडण्यासाठी समाजाला प्रेरित केले.
सावित्रीबाईंनी आधुनिकतेचा बदल विचारांनी स्वीकारला होता...त्यांनी संघर्षाची मशाल हाती घेतली परंतु त्याची धग जनमानसाच्या मनात अजूनही धगधगते का ?
असं म्हंटल जातं कि माणूस शिक्षणाने माणूस होतो पण खरंच तसं घडतं का ?.. शिक्षण माणसाला न्यायसंगत करते का ? आणि जर तसं आहे तर मग बहिणाबाई कोण होत्या ? बहिणाबाई तर अशिक्षित राहूनही माणूस म्हणून जगल्या.
सावित्रीबाई आणि बहिणाबाई हे दोन ध्रुव आहेत. एक आहे विचार म्हणून
अस्तित्व जागवण्याचं आणि दुसरे आहे जीवनदृष्टीने तत्व जगवण्याचे व या दोघांचा एकत्र येण्याचा बिंदू आहे माणुसकी !
"नाटक "लोक- शास्त्र सावित्री"
जनमानसात सावित्रीची ओळख आहे, तिचे नाव आहे परंतु तीचे तत्व रुजले नाही, आणि हे तत्व रुजवण्याची प्रक्रिया "लोक- शास्त्र सावित्री" हे नाटक करते. प्रत्येकाच्या मनात सावित्री जागी होते पण ती व्यवहाराच्या प्रहराने गळते, हे आपण ओळखले नाही तर ती गळत राहणार, हे नाटक त्याला चिन्हीत करते.
सावित्रीने दिशा दाखवली परंतु आपण जागतिकीकरणाने रचलेल्या वाटेवर मार्गक्रमण करत आलो. सावित्रीच्या वाटेवर चालणे म्हणजे विचारांच्या वाटेवर चालणे जे आज अभावाने घडते.
भारताची जनता आणि भारतीय महिला या दोघांचेही निर्णय कोणीतरी दुसरं घेतं आणि ते सहन करतात, शोषणाचे बळी पडतात पण त्याच्याविरुद्ध आवाज उठवत नाहीत.
भारतात आज कितीजण आहेत जे सावित्रीच्या पुढाकाराने शिकले ,
पण सवित्री घडवू शकले नाहीत. कारण प्रश्न आहे रचनात्मक पुढाकाराचा, न्यायसंगत वागण्याचा, माणूस म्हणून जगण्याचा ! माझ्यासाठी पुढाकार कोण घेणार ? या मानसिकतेवर "लोक- शास्त्र सावित्री"
हे नाटक वैचारिक प्रहार करते.
कला माणसात विवेक जागवते, माणसाला माणूस असण्याचा बोध करून देते. म्हणूनच सांस्कृतिक क्रांतीचे सृजनकार या भूमिकेला अंगीकारण्याची ही वेळ आहे.
कलासत्वाला मानवतेसाठी व विश्वाच्या सौहार्दासाठी रचणारा सृजनकार शाश्वत माणूस म्हणून काळासोबत लढतो. आपला काळ निर्माण करतो. "थिएटर ऑफ रेलेवन्स" नाटयसिध्दांताचे "लोक- शास्त्र सावित्री" हे नाटक युगपरिवर्ततनाचा काळ रचते.
परिवर्तनाच्या वाटेवर सांस्कृतिक सृजनकार मनुष्याला हिंसेपासून अहिंसेकडे, आत्महीनतेपासून आत्मबळाकडे, विकारांपासून विचारांकडे, वर्चस्ववादापासून समग्रतेकडे आणि व्यक्तीला सार्वभौमिकतेच्या प्राकृतिक न्याय आणि विविधतेचे सहअस्तित्व व विवेकाच्या दिशेने उत्प्रेरित करतात.
नाटक "लोक- शास्त्र सावित्री" का ?
माणूस म्हणून जगण्यासाठी, न्यायसंगत समाज घडवण्यासाठी...स्वतःच्या आत सावित्री जागविण्यासाठी
सांस्कृतिक पुरोगामित्वाचा पाया रचण्यासाठी
सांस्कृतिक चेतना ही सार्वभौम अधिसत्ता आहे.
सांस्कृतिक सृजनकाराच्या भूमिकेत "लोक-शास्त्र सावित्री" हे नाटक समाजाच्या संवेदनांना व त्यांच्या मृतवत अवस्थेला पेटवून जागे करणारे आहे.
1831 पासून आतापर्यंतच्या काळाचा आलेख घेतला तर लक्षात येईल, त्या काळापासून सुरू झालेले सांस्कृतिक प्रबोधन जागतिकीकरणाने संपवले आहे. .सावित्रीच्या प्रतिरोधाला प्रचारकी व्यक्तिवादाचे स्वरूप देऊन अलगदपणे सर्वसामान्य केले.सावित्रीचा जो प्रतिरोध होता त्याची ताकद संपवली.आता हा प्रतिरोधाचा न्याय पताका घेऊन, "थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत" "लोक- शास्त्र सावित्री" या नाटकाच्या माध्यमातून पुन्हा सावित्रीच्या महत्वाला, तिच्या विचाराला जनमानसात जागवत आहे.
सांस्कृतिक सृजनकार म्हणून सांस्कृतिक चेतना पेटवण्यासाठी कलाकार आणि व्यक्तीची उन्मुक्तता साधणे हे कलात्मक सौंदर्य आहे. कलात्मक सौंदर्य समाजात रुजवणे सांस्कृतिक क्रांतीचा सूत्रपात आहे.
थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत
मागील 28 वर्षांपासून ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ या नाटय़ सिद्धांताने सतत कोणत्याही देशीविदेशी अनुदानाशिवाय आपली जबाबदारी आणि कर्तव्ये निभावली आहेत. प्रेक्षकांच्या सहभागाच्या आधारावर मुंबईपासून मणिपूरपर्यंत हे ‘रंग आंदोलन’ सुरू आहे. ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ने जीवनाला नाटकाशी जोडून मागील 28 वर्षांपासून जातीय मुद्दय़ावर ‘दूर से किसी ने आवाज़ दी’, बालमजुरीवर ‘मेरा बचपन’ अशी, कौटुंबिक हिंसेवर ‘द्वंद्व’, ‘मैं औरत हूँ’, लिंगनिदान या विषयावर नाटक ‘लाडली’, जैविक आणि भौगोलिक विविधतेवर ‘बी-7’ अशी नाटके रंगमंचावर आणली. मानवता आणि नैसर्गिक साधनसामग्रीच्या खासगीकरणाविरोधात ‘ड्रॉप बाय ड्रॉप : वॉटर’, मनुष्याला मनुष्य बनून राहण्यासाठी ‘गर्भ’, शेतकऱयांची आत्महत्या आणि शेतीच्या होणाऱ्या विनाशावर ‘किसानों का संघर्ष’, कलाकारांना कठपुतली बनवणाऱ्या आर्थिक तंत्रापासून कलाकारांच्या उन्मुक्ततेसाठी नाटक “अनहद नाद-अन हर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स”,
शोषण आणि दमनकारी पितृसत्तेच्या विरुद्ध न्याय, समता आणि समानतेची हुंकार देणारे ‘न्याय के भंवर में भंवरी’, समाजात राजनैतिक चेतना जागवण्यासाठी ‘राजगती’ अशा नाटकांच्या माध्यमातून फॅसिस्टवादी ताकदींशी ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ लढत आहे! आजच्या या कठीण काळात ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ने सांस्कृतिक सृजनकार घडवण्याचा निर्धार केला आहे! समाजाच्या मानसिकतेवर कब्जा करणाऱ्या मंडळींपासून आज केवळ सांस्कृतिक सृजनकार मुक्ती देऊ शकतात.
रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांच्याविषयी :
लेखक - दिग्दर्शक "थिएटर ऑफ रेलेवन्स” नाट्य सिद्धांताचे सृजक आणि प्रयोगकर्ता मंजुल भारद्वाज असे रंगचिंतक आणि रंग आंदोलक आहेत, जे राष्ट्रीय आव्हानांना फक्त स्विकारत नाहीत तर आपला रंग विचार "थिएटर ऑफ रेलेवेंस" च्या माध्यमातून ते राष्ट्रीय उदिष्ट जन-माणसांसमोर ठेवतात. ह्या अभिजात लेखक - दिग्दर्शकाने आजतागायत 28 पेक्षा अधिक नाटकांचे लेखन दिग्दर्शन केले आहे. तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर थियेटर ऑफ रेलेवन्स सिद्धांताच्या माध्यमातून 1000 पेक्षा अधिक नाट्यकार्यशाळांचे संचालन केले आहे.