Monday 25 January 2016

अनहद नाद - जिथे प्रेक्षक रंगकर्मी बनतो.


नाटक सहसा दृश्याच्या माध्यमातून रंगमंचावर प्रस्तुत होत असते आणि दृश्यागणिक दृश्यातून पुढे जाता जाता कथा आणि संदेश दर्शकांसमोर मांडत असते. पण ‘अनहद नाद’ हे नाटक पारंपारिक पद्धतीने प्रेक्षकांसमोर प्रस्तुत नाही होत. 

तसे पाहता रंगमंचावर हे नाटक नाटकाराच्या दृष्टीतून आणि त्याच्या स्वतःच्या विश्लेषणातून उद्भवलेले अनुभव व स्टेटमेंट आणि अभिनेता - अभिनेत्रींच्या भावप्रवण अभिनयाच्या माध्यमातून दृश्यमान होते ,परंतु खरे नाटक हे दर्शकांच्या आत प्रस्तुत होते. कलाकार नाटकाराचे शब्द - आंतरशब्द , त्यांचे भाव - आंतरभाव यांना आपल्या कुशल अभिनयाने रंगमंचावर प्रस्तुत करत होते, परंतु त्या शब्दांचा आणि भावांचा खरा तपशील प्रेक्षागृहात बसलेल्या प्रेक्षकांच्या मानवी मनावर आणि हृदय पटल यांवर उमटत होता , जिथे दृश्यही तयार होत होते आणि कथा आपली अर्थपूर्ण परिपूर्णता प्राप्त करत होती. खरं तर नाटक कोणतीही एक कथा सांगत नाही , उलट प्रेक्षागृहातील प्रत्येक प्रेक्षकाच्या आत घडून गेलेल्या आणि घडत असलेल्या कथेला गती देत राहते ,त्याचे पुनरावलोकन करत राहते आणि स्वतः समीक्षक होऊन बघण्याची दृष्टी देते. अशाप्रकारे हे नाटक मंजुल भारद्वाज ह्यांच्या रंग सिद्धांत ‘ थिएटर ऑफ रेलेवंस’ च्या ध्येयाला आकार देते , सिद्ध करते कि प्रथम आणि सर्वात महत्वपूर्ण रंगकर्मी दर्शक आहे.

इथे प्रेक्षागृहात बसलेला प्रेक्षक रंगमंचावर साकार होत असलेल्या दृश्यांना न केवळ पाहतो तर नाटकाराचे शब्द आणि त्या शब्दांच्या सुंदर समायोजनेतून प्रकटलेल्या भावांच्या पट्टीच्या पलीकडे जाऊन स्वतः नाट्य लेखक आणि अभिनेता बनतो आणि आपल्या आपल्या कथांना स्वतः समोर सादर करतो आणि स्वतःच त्याची समीक्षा ही करतो. अश्या प्रकारे मंजुल भारद्वाज यांचे अनहद नाद नाटक पाहणे म्हणजे एका अद्भुत जागतिक अनुभवातून प्रवास करण्याजोगे आहे. हे नाटक न केवळ नाटकांच्या ठराविक मापदंडांना तोडते उलट कोणतीही सीमा नसलेले जग तयार करते. गोस्वामी तुलसी दासांच्या ओळी नुसार " जाकी रही भावना जैसी प्रभू मूरत देखी तिन तैसी".


अनहद नाद मध्ये कोणतीही कथा नाही आहे , तरीही प्रेक्षकांच्या असंख्य कथांची घट्ट विण अतिशय सुंदर पद्धतीने जमली आहे.
अनहद नाद मध्ये कोणतेही पात्र नाही आहे, तरीही दर्शकांच्या जीवनातील सर्व पात्रे सजीव होतात. अनहद नाद मध्ये कोणताही संवाद नाही , तरीही दर्शकांच्या आतील संवादांचे धागे सोडवले जातात.अनहद नाद हा स्वर कानांनी न ऐकला जाणारा आहे, तरीही  प्रेक्षागृहात बसलेले प्रेक्षक त्या स्वरांना न केवळ ऐकतात, तर त्यांच्या उत्तरासाठी अस्वस्थ होतात.

हे निव्वळ नाटक नाही आहे, तर जीवनाला समजण्याची आणि जगण्याची एक अध्यात्मिक यात्रा आहे. हे नाटक " बिन गुरु जान कहाँ से पावे "  च्या  सामर्थ्यावर प्रश्न उठवते आणि दर्शवते की प्रत्येक व्यक्ति हा स्वतःचा गुरु आणि शिष्य आहे. हे नाटक प्रेक्षकांना आपआपल्या चेतना कक्षाच्या द्वाराला खोलण्याकरिता प्रेरित करते, आणि चेतनेच्या पंखांवर स्वार होऊन निसर्ग आणि जीवनाच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आमंत्रित करते.


ह्या नाटकाची समीक्षा करणे सोप्पे नाही कारण हे प्रत्येक प्रेक्षकाला एका समीक्षकाची दृष्टी देते. कलाकारांमध्ये योगिनी चौकने अद्भुत काम केले आहे, तिची संवादफेक आणि भावमुद्रा रसपूर्ण आहे, रससिक्त आहे..रसांमध्ये संमिश्र आहे. अश्विनी नांदेडकर,सायली पावसकर,कोमल खामकर आणि तुषार म्हस्के ह्यांनी अप्रतिम साथ निभावली आहे.
मंजुल भारद्वाज एक नाटककार आणि नाट्य दिग्दर्शक म्हणून अत्यंत यशस्वी ठरले आहेत.


(२२ जानेवारी २०१६ , शुक्रवार रात्रौ ८.३० वाजता , " शिवाजी नाट्य मंदिर " मुंबई मधील प्रस्तुतीची समीक्षा )
धनंजय कुमार
304, सुकांत को. ऑ. हा. सोसायटी, 
सेक्टर-3, आरडीपी-8, चारकोप, 
कांदिवली(प), मुम्बई- 40067. 
मोबाइल – 08080012313.
---------------------------------

No comments:

Post a Comment